Saturday 26 May 2018

महाराष्ट्र चा इतिहास

महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे.

महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसित राज्य आहे.

भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे.

राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे.

मुंबई, देशातील सर्वांत मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे.

तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.

आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.

इतिहास



महाराष्ट्रातील विविध स्थळांचा – नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारत    इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो.

व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.



महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे.

जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.



मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य



महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे.

त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही.

महाराष्ट्र त्या काळात ‘दंडकारण्य’ म्हणून ओळखले जात असे.

मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगीरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला.

मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले.

सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली.

महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती.

इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता.

त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही रूढ आहे.



त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले.

१३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अलाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले.

इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.


मराठा व पेशवे


१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले.

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले.

इ.स. १६७४ मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची ‘अधिकृत’ सुरुवात झाली.



शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात पडले.

भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले.

मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले.

बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपली वर्चस्व प्रस्थापित केले.


इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला.

या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतली.


ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ


ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली.

इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.


महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता.

बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते.

अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते.

मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला.

ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या.

परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुध्द लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला.

मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.



महाराष्ट्र राज्याची निर्मिती


ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते.

परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला.

केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले.

यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.

केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते.

आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.



अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली.

१९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.

परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.



बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..

या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे.

0 comments:

Post a Comment

Total Pageviews

CONTACT US

Prof. Roshan P. Helonde
Mobile / WhatsApp: +917276355704
Email: roshanphelonde@rediffmail.com

Contact Form

Name

Email *

Message *

Archive

Notes Planet Copyright 2018. Powered by Blogger.